शेतातील मुरुम वाहतुकीला विरोध केल्याचा राग; जेसीबी बकेटने धमकी, १५ जणांविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल-Crime News
धाराशिव : प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील खडकी शिवारात शेतातील मुरुम वाहतुकीबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुकाराम मकुराम मनसावले (वय ६०, रा. खडकी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून ही कारवाई करण्यात आली. दि. ९ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास खडकी शिवारातील त्यांच्या शेतात ही घटना घडली.
या प्रकरणातील आरोपी म्हणून नितीन बंडु जाधव, रवि जाधव (दोघे रा. खडकी), जेसीबी चालक तसेच इतर १२ इसम यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
फिर्यादीनुसार, शेतातील मुरुम का घेऊन जात आहात, अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून आरोपींनी एकत्र जमून फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच जेसीबीच्या बकेटचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर तुकाराम मनसावले यांनी वैद्यकीय जबाब दिल्यानंतर दि. १३ जून २०२६ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १९१(२), १९१(३) व १९० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण आणि मुरुम वाहतुकीसंदर्भातील बाबींची पडताळणी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

0 Comments