चिवरी/ बालाघाट न्युज टाइम्स: राजकारणाची प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत समजली जाते. ग्रामपंचायत कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर गाव पुढाऱ्यांनी निवडणुकीत रंग उधळायला सुरुवात केली आहे. नवीन वर्षाआधीच गावाला नवीन कारभारी मिळणार आहेत. त्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे, राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजणाऱ्या चिवरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा खरा हिरो कोण? याची जोरदार चर्चा गावातील चौका चौकामध्ये होत आहे. या निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. या निवडणुकीत सरपंच पद महिला सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असल्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक पुरुष उमेदवारांची गोची झाली आहे. एकूण ११ जागेसाठी ही निवडणूक होत असून पन्नास टक्के महिला राखीव आहे, गाव पुढाऱ्यांनी निवडणुकीचा बिगुल वाजताच मोर्चे बांधणी सुरू करून बैठकींना सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण गुलाबी बोचऱ्या थंडीत चांगलेच तापले आहे, वार्ड आरक्षणामुळे अनेक वॉर्डात बदल झाल्याने काहींचे सदस्य होण्याची स्वप्नही भंगले असून त्यांना नवीन वार्ड शोधावा लागत आहे. जातीय समीकरणातून कोणत्या वार्डात कोणता उमेदवार दमदार असेल याची चर्चा जोर धरत आहे .सर्वसामान्य नागरिकांना मात्र यात उत्साह दिसून येत नाही, दोन पॅनेल व्यतिरिक्त तिसऱ्या पॅनलची चर्चा ऐकायला मिळत आहे त्यामुळे होणारी निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .येथील सरपंच पद हे सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव आहे . मात्र गाव गाड्याची प्रमुख महिला झाली तरी तिचा सारथी बनून गावगाडा हाकायचा बहुमान मिळावा म्हणून उमेदवारांचे पती, मुलगा, असे संबंधित नातेवाईक जीवाचे रान करत आहे.
गावचे कारभारी निवडण्यासाठी भावी कारभारी निवडणुकीच्या तोंडावर गावच्या कारभारात मश्गुल होऊन विकासाच्या गप्पा मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सरपंच पद हे थेट जनतेतून असल्याने सर्व प्रतिष्ठित व धनदांडगे डोळा ठेवून असून त्यांच्याकडून अद्याप पत्ते उघड केली जात नसल्याने कुणीही स्पष्ट भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि पराभवाचा झटका कोणाला बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
0 Comments