Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत, सरपंच पदासाठी अतितटीची लढत रंगणार


चिवरी:  राजकारणाची  प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत समजली जाते. ग्रामपंचायत कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर गाव पुढाऱ्यांनी निवडणुकीत रंग उधळायला सुरुवात केली आहे. नवीन वर्षाआधीच गावाला नवीन कारभारी मिळणार आहेत. त्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी दोन पॅनलमध्ये  मोठी चुरशीची लढत होत आहे, राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजणाऱ्या चिवरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा खरा हिरो कोण? याची जोरदार चर्चा गावातील चौका चौकामध्ये होत आहे , त्यामुळे आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात ? याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.  या निवडणुकीत दुरंगी लढत होत असुन सरपंच पद महिला सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असल्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक पुरुष उमेदवारांची गोची झाली आहे. एकूण ११ जागेसाठी ही निवडणूक होत असून पन्नास टक्के महिला राखीव आहे, गाव पुढाऱ्यांनी निवडणुक चिन्ह वाटप होताच प्रचाराचा नारळ फोडून डोअर टू डोअर  प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण गुलाबी बोचऱ्या थंडीत चांगलेच तापले आहे, वार्ड आरक्षणामुळे अनेक वॉर्डात बदल झाल्याने काहींचे सदस्य होण्याची स्वप्नही भंगले असून त्यांना नवीन वार्ड शोधावा लागला आहे. जातीय समीकरणातून  कोणत्या वार्डात कोणता उमेदवार दमदार असेल याची चर्चा जोर धरत आहे .सर्वसामान्य नागरिकांना मात्र यात उत्साह दिसून येत नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून भावी सरपंचांना सुशिक्षित मतदार जनजागृती चे पोस्टही व्हायरल  करत आहेत, " पंधरा दिवस तुम्हाला ओल्या पार्ट्या खाऊ घालणाऱ्या पेक्षा पाच वर्ष तुमच्या सोबत राहणाऱ्या चेहऱ्यांना संधी द्या असे ठोचक जनजागृतीचे  संदेशही फिरत आहेत , यंदा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार नसल्यामुळे येथील निवडणूक अटीतटीची होणार आहे .येथील सरपंच पद  सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव आहे ,मात्र गाव गाड्याची प्रमुख महिला झाली तरी तिचा सारथी बनून गावगाडा हाकायचा बहुमान मिळावा म्हणून उमेदवारांचे पती, मुलगा, असे संबंधित नातेवाईक जीवाचे रान करत आहे. गावचे कारभारी निवडण्यासाठी भावी कारभारी निवडणुकीच्या तोंडावर गावच्या कारभारात मश्गुल होऊन विकासाच्या गप्पा मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 वास्तविक गावामध्ये महालक्ष्मी मंदिर रस्त्या, रखडलेले महादेव मंदिर बांधकाम , बंद अवस्थेत असलेले हातपंप, मागील तीन वर्षापासून बंद असलेली बस सेवा अशा ज्वलंत गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन निवडून येणाऱ्या उमेदवाराने ते काम पूर्ण करावे अशा अपेक्षा सुज्ञ मतदाराकडून व्यक्त होत आहेत . त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि पराभवाचा झटका कोणाला बसणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments