केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रती लाभार्थी १५० रुपये थेट रक्कम हस्तांतरणाची योजना कार्यान्वित
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
धाराशिव ,दि.१७ : केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी, 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रती लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची (Direct Benefit Transfer-DBT) योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम कुटुंबातील महीला प्रमुखाचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये PFMS प्रणाली आधारे थेट जमा करण्यात येत आहे.
15 जून 2023 पर्यंत उस्मानाबाद जिल्हयातील एकूण 5 हजार 933 शिधापत्रिकामधील 27 हजार 266 लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी प्रती माह 150 रूपये प्रमाणे (माहे जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीकरीता ) एकूण एक कोटी 22 लाख 69 हजार 700 रुपये PFMS प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत रक्कम लवकरच पात्र शिधापत्रिकाधारक महीला कुटुंब धारकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
तथापि, या योजनेत पात्र असलेल्या शिधापत्रिकाधारकांनी आज रोजीपर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज संबंधीत रास्त भाव दुकानदार अथवा संबंधीत तलाठी यांच्याकडे जमा केले नसल्यास पात्र शिधापत्रिकाधारकांनी DBT साठी आवश्यक असलेला बँक खात्याचा विहीत नमुन्यातील फॉर्म सबंधीत रास्त भाव दुकानदार, तलाठी यांच्याकडून हस्तगत करावा आणि हा फॉर्म भरून अर्जासोबत शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकीत प्रत, बँक पासबुकाच्या पहिल्या (खात्याचा आवश्यक तपशील दशविणाऱ्या) पानाची प्रत, शिधापत्रिकेतील सदस्यांचे आधारकार्डाची छायांकित प्रत, जमीनीचा 7/12 व 8 अ तसेच विहीत नमुन्यातील शपथपत्र आदी कागदपत्रासंह रास्त भाव दुकानदार, सबंधीत तलाठी यांच्याकडे तात्काळ जमा करण्यात यावेत.
या योजनेअंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम महिला कुटुंबप्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या करीता जर काही पात्र शिधापत्रिकाधारक महिला कुटूंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नस्ल्यास त्या महिलांनी राष्ट्रीयीकृत बॅकेत अथवा पोस्टात खाते काढून घ्यावे आणि त्याची छायांकित प्रत अर्जासोबत वरील कागदपत्रांसह संबंधीत दुकानदार अथवा तलाठी यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी केले आहे.
0 Comments