अनावश्यक ठिकाणी टाकलेल्या मुरमाचे केले पूजन, ढिगार्यावर बसून केले नाष्टा आंदोलन
प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव
धाराशिव :- शहरातील प्रभाग क्रमांक चार व एक मधील मिल्ली कॉलनी गालिब नगर येथे रस्त्यावर मुरूमाची गरज असताना अष्टविनायक चौक ते बाळासाहेब ठाकरेनगर मार्गावर मुरूमाचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. या मार्गावर अडसर ठरलेल्या मुरमाच्या ढिगार्यांचे पूजन करून त्या ढिगार्यांवर सोमवारी (दि.14) नाष्टा आंदोलन करण्यात आले.समाज सेवक प्रशांत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, गालिबनगर, निजामुद्दीन कॉलनी, रजा कॉलनी, प्रेरणानगर, नारायण कॉलनी, संभाजीनगर या भागात काळी माती वर आल्यामुळे चिखल होत असल्याने नगर परिषदेसमोर चिखलफेक आंदोलन, मोर्चा काढल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. रस्त्यावरील चिखलामुळे अपघात होऊन नागरिकांना दुखापत होत आहे. तरीही राजकीय हस्तक्षेपामुळे नगर परिषद प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. नगर परिषद प्रशासनाने स्थानिक माजी नगरसेवकांच्या दबावाला बळी पडून चालू असलेले काम बंद पाडले. तसेच अष्टविनायक चौक ते बाळासाहेब ठाकरे नगर मार्गावरील रस्त्यावर गरज नसताना आणि सदरील रस्ता डीपीसीमध्ये मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता मिळालेली असताना या मार्गावर मुुरूमाचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. सदरील प्रकार म्हणजे आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला असा प्रकार आहे. म्हणून मुरूमाच्या ढिगार्यावर बसून नाष्टा करत आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पुरूष, महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments