Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणासाठी आमदार कैलास पाटील यांचे मंत्रालयासमोर लाक्षणिक उपोषण

मराठा आरक्षणासाठी आमदार कैलास पाटील यांचे मंत्रालयासमोर लाक्षणिक उपोषण 

धाराशिव दि,३१: मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी पुन्हा एकदा आमदार कैलास पाटील यांनी थेट भुमिका घेत सरकारला धारेवर धरल आहे. मुंबईत मंत्रालय परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर त्यांनी सहकाऱ्यांसह लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.                     

मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले असुन आज सातव्या दिवशीही सरकार आपली भुमिका जाहीर करत नाही. अन्न तर सोडा पण पाणीही वर्ज्य करण्याची प्रतिज्ञा करत त्यांनी समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारला आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. तरी सरकार त्यांची कसलीही दखल घेत नसल्याने समाज आक्रमक होत आहे. समाजांच्या संयमाची अग्नीपरिक्षा सरकार घेत असुन त्यामुळे राज्यभर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अनेक ठिकाणी निर्माण झाला आहे. राज्यभर आंदोलन सुरू असतानाही जबाबदार असणारे सरकार इतकं स्वस्थ बसल्याने आता सामान्य जनतेत आमदार व लोकप्रतिनिधीबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.आरक्षण देण्याचा शब्द दिल्यानंतरही ४० दिवसानंतरही सरकार गंभीर नसल्याने हा आक्रोश निर्माण झाला आहे. आतातरी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजे असे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्याची सद्बुद्धी या सरकारला द्यावी अशी प्रार्थना महात्मा गांधीजी यांच्यासमोर त्यांनी केली आहे. त्यांनी मंत्रालय परीसरात असलेल्या गांधी उद्यानातील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केले. उपोषणानंतर राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची त्यांच्यासह इतरही आमदारांनी भेट घेऊन  भारतीय संविधानाच्या  प्राप्त अधिकारातून त्यांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे असे निवेदन दिले. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याची  विनंती केली आहे. आमदार डॉ. राहुल पाटील, निलेश लंके, राजू नवघरे, यशवंत माने, माधवराव पाटील जवळगावकर, राजेश पाटील, बाळासाहेब आजबे, बाबासाहेब पाटील, मोहनराव हांबर्डे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments