Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: १ रुपयात होणार पीक विम्याची नोंदणी १५ जुलैपर्यंत मुदत पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा; कृषि विभागाचे आवाहन

धाराशिव: १ रुपयात होणार पीक विम्याची नोंदणी १५ जुलैपर्यंत मुदत पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा; कृषि विभागाचे आवाहन


धाराशिव दि.१९: खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती,किड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत www.pmfby.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु आहे.

खरीप हंगामात पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 15 जुलै 2024 आहे.पिक विमा योजना ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असुन कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करणेबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे.

जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत.त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला असला तरी सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी प्रती अर्ज केवळ 1 रुपया भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे.   

शेतकरी हिस्यातील उर्वरीत पिक विमा हप्त्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे किंवा पेरणी करावयाची आहे.अशा शेतकऱ्यांनी शासन निर्णयानुसार एक रुपयात विमा अर्ज सादर करावेत.ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे.ते पिक शेतात पेरल्याबद्दलचे स्वयंघोषणापत्र,सात बारा व 8 अ चा उतारा,आधारकार्ड,बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रतिसह नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र,कॉमन सर्विस सेंटरमधून बँकेमधून किंवा शेतकऱ्याकडे स्वत: ची सोय असल्यास स्वत: पिक विमा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विमा हप्ता भरुन पिक संरक्षित करावे.

तरी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आत्ताच पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments