लाडक्या बहिणींना रांगेत उभे करणारा धुर्त भाऊ! पराभवाच्या धुक्यात अडकल्याने महायुतीच्या बोटीचा फसव्या योजनांचा गलगलाट.-ॲड. शीतल शामराव चव्हाण
राजकारणी हे धुक्यात अडकलेल्या बोटीसारखे असतात. जेव्हा अडचणीत येतात तेव्हा गलगलाट करतात. चारशे पारच्या गमजा मारणाऱ्यांना लोकसभा निवडणूकांच्या निकालाने जमीनीवर आणले. महाराष्ट्रात पक्ष, नेते फोडून फुगलेल्या महायुतीचीही हवा गेली. महायुतीचे नेते गोंधळात पडले, विधानसभेला काय होईल याच्या धास्तीने पुरते गांगारुन गेले. महायुतीची बोट पराभवाच्या धुक्यात अडकली. अशा गांगारुन गेलेल्या आणि पराभवाच्या धुक्यात अडकलेल्या अवस्थेत त्यांनी काहीतरी करुन गलगलाट करावा आणि लोकांनी आपला बचाव करावा अशी शक्कल लढवली. पावसाळी अधिवेशनात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' यासह अनेक योजनांच्या खैराती जाहीर करुन आपला बिथरलेपणा सावरण्यासाठी महायुतीने सबंध महाराष्ट्रात एकच गलगलाट पसरवून दिला.
आज रोजी महाराष्ट्रभर काय चालू आहे तर 'लाडकी बहिण योजने'ची तुफान बॅनरबाजी, कार्यकर्त्यांची ही स्किम समजावून सांगण्यासाठीची कसरत, तमाम महिला भगिनींची या योजनेचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठीची लगबग आणि कागदात्र काढून देण्यासाठी, योजनेचा फॉर्म भरुन देण्यासाठी दलालांचा सुळसुळाट!
लोकसभेच्या निकालाने खचलेल्या महायुती सरकारने महाराष्ट्रात सद्ध्याला हा गोंगाट पसरवून दिलाय खरा पण ह्या गोंगाटाने महायुतीने केलेले पाप झाकले जाणार नाहीत. मूळात महायुती बनली ती खोक्यांचे आमीष, दगाबाजी, घोटाळे दाबण्यासाठी पत्करलेली लाचारी यातून! त्यामूळे खोके मिळवून किंवा खोके टिकवून ठेवण्यासाठी एकत्र आलेल्यांना आपण जनतेलाही असेच काहीतरी देण्याचे आमीष दाखवून आपल्या पापावर पडदा टाकू शकतो असे वाटणे स्वाभाविक आहे. पण देशातील आणि राज्यातील एकंदर वातावरण पाहता आता जनतेचा कल, कौल आणि विचारांची दिशा बदलल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
गुजराती रंगा-बिल्लाने उज्वला गॅस योजनेचा बोलबाला करुन अशीच जनतेची दिशाभुल केली होती. पुढे घरगुती गॅसचे दर कैक पटीने वाढवून या उज्वला योजनेला त्यांनीच काळ्याकुट्ट अंधारात गुडुप करुन टाकले. मग त्यांचा पदर धरुन महाराष्ट्राचा कारभार करणारे हे दिवटे अशा योजना आणून काय दिवे लावतील हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
मूळात जनतेला फुक्कट पैसे द्यावेत अशी जनतेतून कुठलीही मागणी नाही. जनता त्रस्त आहे ती शिक्षणाच्या बाजारीकरणाने, बेरोजगारीने, भ्रष्टाचाराने, सक्तीच्या जाचक करवसुलीने, गगनाला भिडलेल्या महागाईने, ढिसाळ आरोग्य व्यवस्थेने, वीजपुरवठा आणि पाणीपुरवठ्याच्या समस्येने, महिलांवर आजही होणाऱ्या अत्याचाराने, समान कामासाठी महिलांना समान वेतनाचा अधिकार प्राप्त न झाल्याने, देशातील एकूण संपत्तीत आजही महिलांना निम्मा वाटा न मिळाल्याने. पण या सगळ्या मुलभूत आणि हक्काच्या विषयांवर बोलूच नये यासाठी लाडकी बहिण योजनेचा बोळा लोकांच्या तोंडात कोंबण्याचा आणि त्या बळावर येवू घातलेल्या निवडणूका जिंकण्याचा महायुतीचा कयास आहे. कारण, अशीच योजना राबवून मध्यप्रदेशात यांचे भाउबंध तिथल्या लोकांना फसवण्यात यशस्वी झाले आहेत. या योजनेमूळे मध्यप्रदेशात काही क्रांती वगैरे आलेली नाही किंवा मध्यप्रदेशातील लोकांच्या जीवनमानाचा कायापालट झालेला नाही. योजना आणणारे तात्पुरता राजकीय फायदा मिळवण्यात यशस्वी झाले पण योजनेमूळे लोकांचे मुलभूत प्रश्न मिटवण्यात यश आले नाही. त्यामूळे मध्यप्रदेशातील लोकांना लागलेली ठेच पाहून महाराष्ट्रातील जनता शहाणी होणार आहे. तेवढी प्राज्ञा महाराष्ट्राच्या मातीत निश्चितच आहे.
लोकांचे मुलभूत प्रश्न तिष्ठत ठेवून त्यांना फुक्कटच्या खैराती वाटून लाचार करण्याचे धोरण स्वत: दिल्लीश्वरांपुढे लाचारी पत्करुन सत्तेत आलेल्यांना मोठे गोंडस वाटत असेलही. पण अशा धोरणांनी लोक परावलंबी होतात, त्यांच्यातील उद्यमशीलता कमी होते, मूळ प्रश्न दुर्लक्षित राहतात आणि योजनेची हवा करुन काही लोक राजकीय स्वार्थ साधतात हे वास्तव जनमानसात वायुवेगाने पसरत आहे.
महाराष्ट्राच्या मातीत जिजाऊ, अहिल्यामाई, रमाई, सावित्रीमाई, फातिमाबी अशा झुंजार रणरागिनी होवून गेल्या आहेत. या रणरागिण्यांनी लढण्याची, स्वाभिमानाची, स्वातंत्र्याची शिकवण दिलेली आहे. आज मुलभूत प्रश्न तसेच ठेवून महिन्याला काही रक्कम देण्याच्या नावाखाली याच मातीतील महिलांना कागदपत्रे गोळा करण्याच्या क्लिष्ट कामात, आधार कार्डाला पॅन कार्ड, रेशन कार्डाला अमूक एक कार्ड, बॅंकेचे खाते वगैरे वगैरे जोडत बसण्याच्या उपद्व्यापात, दलालांच्या घोळक्यात आणि फॉर्म भरण्याच्या रांगेत या सरकारने उभे केले आहे. ही योजना म्हणजे महिलांचा एकप्रकारे अपमान आहे. ज्या भावाला आपल्या लाडक्या बहिणीला काही द्यायचे आहे तो आपल्या लाडक्या बहिणीला अशाप्रकारे कागदपत्रांच्या क्लिष्ट औपचारिकतेत, फॉर्म भरण्याच्या रांगेत आणि दलालांच्या घोळक्यात उभा करेल काय? लाडकी बहिण म्हणत तमाम महिलांना आपल्या राजकीय फायद्यासाठी गंडवणारा धुर्त भाऊ महाराष्ट्राच्या गादीवर बसला आहे. त्याच्यापासून सावध राहण्याची आणि इतरांना सावध करण्याची जबाबदारी तमाम जिजाऊ, अहिल्यामाई, रमाई, सावित्रीमाई, फातिमाबी यांच्या लेकींची आहे.
पराभवाच्या धुक्यात अडकलेल्या महायुतीच्या बोटीने फसव्या योजनांचा कितीही गलगलाट केला तरी जनताजनार्दन त्यांच्या बचावासाठी धावणार नाही हे निश्चित आहे.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
0 Comments