चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची चाळण, भाविकांची प्रचंड गैरसोय रस्त्यासाठी एक कोटी निधी मंजूर, मात्र प्रत्यक्ष कामाला मुहूर्त सापडेना
चिवरी : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. नळदुर्ग - तुळजापूर रोडवरील चिवरी पाटी ते महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या झालेल्या या दुरावस्थेमुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्या संदर्भात वारंवार दैनिक पुण्यनगरीने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता, अखेर या वृत्ताची दखल घेऊन संबंधित लोक प्रतिनिधीनी संबंधित विभागाला रस्ता दुरुस्तीची मागणी करून निधी मंजूर उपलब्ध केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या आराखड्यातून या रस्त्यासाठी एक कोठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र पुढील प्रशासकीय प्रक्रिया होण्यास विलंब होत असल्यामुळे काम रखडले आहे. त्यामुळे या यंदा तरी या रस्ता दुरुस्तीला मुहूर्त मिळणार का? असं सवाल ग्रामस्थातून उपस्थित केला जात आहे.
बालाघाट डोंगररांगेच्या कुशीत असलेल्या चिवरी येथील महालक्ष्मी देवस्थानच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी वर्षभर मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमेला हजारो भाविक दाखल होतात. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येणाऱ्या भाविकांसह ग्रामस्थांना तारेवरची कसरत करून जीवघेणा प्रवास या रस्त्यावरून करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामीण भागातील रस्ते दहा ते पंधरा वर्षे होत नाहीत त्यामुळे मिळालेल्या निधीतून हा रस्ता दर्जेदार करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी या रस्त्याचे काम येणाऱ्या पावसाळ्याआधी पूर्ण व्हावे अशी मागणी भाविकांसह ग्रामस्थातून होत आहे.
0 Comments