शेत जमिनीच्या मोजणीसाठी २ हजार रुपयाची लाच घेताना भूमि अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात, धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Hot Posts

6/recent/ticker-posts

शेत जमिनीच्या मोजणीसाठी २ हजार रुपयाची लाच घेताना भूमि अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात, धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

शेत जमिनीच्या मोजणीसाठी २ हजार रुपयाची लाच घेताना भूमि अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात, धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


धाराशिव : शेतजमिनीच्या मोजणीची कायमखुना करण्यासाठी 3000 रुपयांची लाच मागणाऱ्या व नंतर तडजोडीनंतर 2000 रुपये लाच स्वीकारणाऱ्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वाशी येथील आवक-जावक लिपिकाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले; या कार्यालयातील गैरव्यवहारांचे वाभाडे निघूनही निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांची पैशाची हाव सुटली नसल्याचे मंगळवारी लाचखोरावर झालेल्या कारवाईतून उघड झाले.

याबाबत एसीबी कडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,तक्रारदाराने आपल्या आईच्या नावावरील गट नंबर 444 मधील शेतजमिनीच्या मोजणीसाठी संबंधित कार्यालयात अर्ज दाखल केला होता. यावरून दिनांक 7 मे 2025 रोजी मोजणी करण्यात आली होती. मात्र, हद्द कायम खुणा करण्यासाठी लिपिक दिगंबर मारुती ढोले (वय 45), रा. वाशी, मूळ रा. हदगाव, ता. पाथरी, जि. परभणी, यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली.

तक्रारीची पडताळणी दिनांक 26 मे रोजी करण्यात आली. पंचासमक्ष ढोले यांनी लाच मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, आज 27 मे रोजी सापळा कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान ढोले यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष 2000 रुपये स्वीकारले आणि त्याच क्षणी त्यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली.

ढोले यांच्या अंगझडतीत 2000 रुपयांची लाच रक्कम व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्यावर लाच प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत कलम 7 नुसार वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव युनिटच्या पोलिस निरीक्षक श्री. विकास राठोड यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पर्यवेक्षणाखाली पार पडली. पथकात पोलीस अंमलदार आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी तसेच पो. ना. दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.

भ्रष्टाचाराविरोधात जनतेने पुढे यावे व अशा प्रकरणांची तक्रार टोल फ्री क्रमांक 1064 वर किंवा 9923023361, 9594658686 या मोबाईल क्रमांकांवर करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments