तुळजापूर : रिन्यु पवन चक्की कंपनीच्या पोलवर चढलेल्या २५ वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागुन मृत्यू; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-
![]() |
| मयत दत्ता वाघमारे |
धाराशिव : रिन्यु पवन चक्की कंपनीच्या वीजतारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याची पूर्ण कल्पना असतानाही तरुणास पोलवर चढविल्यामुळे झालेल्या अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तुळ) येथे दि,१४ रोजी सायंकाळचे सुमारास घडली आहे. या प्रकरणी विदयाधर तानाजी जाधव व जितेंद्र गुलाब मस्के (दोघे रा. देवसिंगा तुळ, ता. तुळजापूर) हे दोघे जबाबदार असल्याचा आरोप मृत तरुणाच्या बहिणीने केला असून, याप्रकरणी नमूद दोन जनाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत तरुणाचे नाव दत्ता हब्बास वाघमारे (वय २५) असे असून तो मजुरी, मिस्त्री व बांधकामाच्या ठिकाणी काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. याबाबत त्याची बहीण निकिता अक्षय मस्के (वय २४, रा. भिमनगर, देवसिंगा तुळ) हिने पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास विदयाधर जाधव हा त्यांच्या घरी आला. त्याने आपल्या शेतातून रिन्यु कंपनीच्या वीजतारा गेलेल्या असून मोबदला मिळाला नसल्याने त्या तोडण्याचे काम असल्याचे सांगितले.
दत्ता हा इलेक्ट्रीशियन नसल्याने व कामाचा अनुभव नसल्याने त्याने प्रथम जाण्यास नकार दिला. मात्र, “तारांमध्ये करंट नाही, तसेच कंपनीची परवानगी घेतलेली आहे,” असे खोटे सांगून व हजेरीपोटी पाचशे रुपये देत त्याला सोबत नेण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.यानंतर ग्रामपंचायतीची शिडी लावून रिन्यु पवन चक्की कंपनीच्या पोलवर दत्ता यास चढविण्यात आले. पोलवर चढताच त्याला जोराचा विद्युत धक्का बसून तो खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्यास प्रथम तुळजापूर येथील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात व नंतर धाराशिव येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.वीजप्रवाह सुरू असलेल्या तारांवर कामास लावून तरुणाच्या जीवाशी खेळ करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला याप्रकरणी या प्रकरणी निकीता अक्षय म्हस्के, वय 25 रा. भिमनगर देवसिंगा तुळता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.15.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 105,3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.शवविच्छेदनानंतर दुपारी दत्ता वाघमारे यांच्यावर देवशिंगा तुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे देवसिंगा तुळ परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे हे करीत आहेत.


0 Comments