धाराशिव: श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांवर मार्गदर्शन-Shripatrav Bhosale High School Dharashiv
धाराशिव: श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव येथे डॉ. मंजुळा आदित्य पाटील यांच्या पुढाकाराने फिजिक्सवाला (PW) अंतर्गत अध्ययन करणाऱ्या इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तातडीचे वैद्यकीय उपचार व प्राथमिक उपचार (इमर्जन्सी मॅनेजमेंट अँड फर्स्ट एड) या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना अपघात, चक्कर येणे (कमी रक्तदाब), साप चावणे, स्ट्रोक, अॅलर्जी, भाजणे, दम्याचा झटका, उष्माघात, रक्तस्राव, बेशुद्धावस्था तसेच श्वासोच्छवास थांबणे अशा विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये तात्काळ व योग्य प्रतिसाद कसा द्यावा, याबाबत शास्त्रशुद्ध माहिती देणे हा होता. यावेळी प्राथमिक उपचारांचे ए.बी.सी. तत्त्व (एअरवे, ब्रीदिंग, सर्क्युलेशन) तसेच सी.पी.आर. व इतर जीवनरक्षक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. रणजीत कदम (एम.डी. मेडिसिन) यांनी आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या प्राथमिक उपचारांचे महत्त्व स्पष्ट केले. बारा वर्षांचा वैद्यकीय अनुभव असलेले डॉ. कदम सध्या पल्स व रुक्मिणी हॉस्पिटल येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. तसेच डॉ. दिप्ती शिंदे, भूलतज्ज्ञ (जीएमसी, धाराशिव) व नोबल हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या डॉक्टर यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्राथमिक उपचार कसे करावेत, याचे प्रभावी सादरीकरण केले.
यावेळी डॉ. श्रद्धा मुळे, पॅथॉलॉजिस्ट (श्रेयस हॉस्पिटल) व डब्ल्यू.डी.डब्ल्यू.च्या सचिव तसेच डॉ. कौशाली राजगुरू, राजगुरू टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालिका व डब्ल्यू.डी.डब्ल्यू.च्या अध्यक्षा आदी मान्यवर डॉक्टरांची खास उपस्थिती लाभली. या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन फ्लाईंग किड्सच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुळा आदित्य पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे यांनी भूषविले. यावेळी उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे, श्री. ए. व्ही. भगत, श्री. एस. एस. सदाफुले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. बी. मेटे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. पी. ए. गर्जे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपत्कालीन प्रसंगी घाबरून न जाता योग्य निर्णय घेण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळाले.


0 Comments