सायबर पोलिसांची तत्परता! 1.54 लाखांची ऑनलाईन फसवणूक रक्कम तक्रारदारास परत-cyber Crime Dharashiv News
धाराशिव : ऑनलाईन व्यवहार करताना झालेल्या चुकीमुळे 1 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक झालेल्या तक्रारदारास सायबर पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे संपूर्ण रक्कम परत मिळाल्याची समाधानकारक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी पूनम दिपक दंडनाईक (रा. किणी, ता. जि. धाराशिव) यांनी धाराशिव येथील आडत बाजारात सोयाबीन विक्री केली होती. यानंतर ग्राहकाला पैसे पाठविताना चुकून त्यांनी चुकीच्या QR स्कॅनरवर 1,54,000 रुपये ट्रान्सफर केले. संबंधित अज्ञात व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या व्यक्तीने पैसे परत देण्यास नकार दिला.
घटनेची गंभीर दखल घेत तक्रारदार यांनी तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. तसेच एनसीसीआर (National Cyber Crime Reporting Portal) वरही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
सायबर पोलीस ठाणे धाराशिव यांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करत संबंधित बँकेशी पत्रव्यवहार केला. तपासादरम्यान अज्ञात खात्यातील रक्कम फ्रीझ करण्यात आली. त्यानंतर बँकेने कोर्ट आदेशाची मागणी केल्यामुळे संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून कोर्ट ऑर्डर सादर करण्यात आली.
या सर्व प्रक्रियेनंतर दिनांक 17 मार्च 2026 रोजी तक्रारदार यांना संपूर्ण 1,54,000 रुपये परत मिळाले. यामुळे तक्रारदारांनी सायबर पोलीस स्टेशनचे मनापासून आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, पोलीस शिपाई गाडे (80) व सुर्यवंशी (640) यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
👉 नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन :
धाराशिव पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाईन व्यवहार करताना अत्यंत काळजी घ्यावी. जर कोणाचीही ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग किंवा आर्थिक नुकसान झाले असेल, तर त्वरित राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधावा किंवा एनसीसीआर पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तसेच जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

0 Comments