🔴 पवनचक्क्यांवरील ॲल्युमिनियम तार चोरी करणारी टोळी जेरबंद; ७५० किलो मुद्देमाल जप्त, ८ गुन्ह्यांचा उलगडा -Dharashiv Robbery Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

🔴 पवनचक्क्यांवरील ॲल्युमिनियम तार चोरी करणारी टोळी जेरबंद; ७५० किलो मुद्देमाल जप्त, ८ गुन्ह्यांचा उलगडा -Dharashiv Robbery Crime News

🔴 पवनचक्क्यांवरील ॲल्युमिनियम तार चोरी करणारी टोळी जेरबंद; ७५० किलो मुद्देमाल जप्त, ८ गुन्ह्यांचा उलगडा -Dharashiv Robbery Crime News  


धाराशिव : जिल्ह्यातील पवनचक्क्यांवरील ॲल्युमिनियम तार चोरीच्या मालिकेला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने मोठा आळा घातला आहे. धाडसी कारवाई करत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ७५० किलो वजनाच्या सुमारे ३ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम तारा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे एकूण ८ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

दिनांक १७ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार बालाजी उर्फ आवड्या अजिनाथ शिंदे (वय २४) व शहाजी भीमराव शिंदे (वय ३२, दोघे रा. मांडवा, जि. धाराशिव) यांच्या ताब्यात पवनचक्कीतील चोरीच्या ॲल्युमिनियम तारा असल्याचे समजले.

पथकाने तत्काळ सापळा रचून दोन्ही संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी तुळजापूर व वाशी तालुक्यातील नळदुर्ग, चिवरी, मानेवाडी, जिन्नर आणि दहिफळ परिसरातील पवनचक्क्यांच्या खांबांवरून ॲल्युमिनियम तारा चोरी केल्याची कबुली दिली.

यानंतर पोलीसांनी गुन्हे अभिलेख तपासले असता अशा प्रकारचे ८ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचनामा करून ७५० किलो वजनाच्या ॲल्युमिनियम तारा जप्त करण्यात आल्या आहेत.

चौकशीत आरोपींनी त्यांच्या अन्य साथीदारांची नावेही उघड केली असून या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

👉 या कारवाईमुळे पवनचक्की प्रकल्पांवरील चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments