तुळजापूर–हंगरगा पाटी–मंगरूळ–इटकळ मार्ग दोन पदरी करण्याची मागणी तीव्र -Tuljapur -Hangarga -Mangurl -Itkal Road

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर–हंगरगा पाटी–मंगरूळ–इटकळ मार्ग दोन पदरी करण्याची मागणी तीव्र -Tuljapur -Hangarga -Mangurl -Itkal Road

तुळजापूर–हंगरगा पाटी–मंगरूळ–इटकळ मार्ग दोन पदरी करण्याची मागणी तीव्र -Tuljapur -Hangarga -Mangurl -Itkal Road 


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

भाविकांसाठी सोयीचा शॉर्टकट; दररोज ६ ते ८ हजार वाहनांची वर्दळ – वेळ, इंधन व पैशांची बचत होणार.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर येथून अक्कलकोटकडे जाणारा हंगरगा पाटी–मंगरूळ–इटकळ मार्ग भाविकांसाठी सोयीचा आणि कमी अंतराचा ठरत असल्याने हा रस्ता दोन पदरी (रुंदीकरण) करण्याची मागणी आता जोर धरत आहे. सध्या या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दररोज सुमारे ६ ते ८ हजार भाविकांच्या वाहनांची ये-जा होत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.सध्या तुळजापूरहून नळदुर्गमार्गे अक्कलकोटला जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध असला, तरी त्या मार्गाने सुमारे १५ किलोमीटर अंतर अधिक पडते. भविष्यात या मार्गावर टोल आकारला जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे भाविक व वाहनचालक हंगरगा पाटी–मंगरूळ–इटकळ मार्गालाच मोठी पसंती देत असताना दिसून येत आहेत.

तीर्थक्षेत्रांना जोडणारा महत्त्वाचा दुवा

विशेष म्हणजे हा मार्ग तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर आणि अक्कलकोट या प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारा महत्त्वाचा दुवा बनत आहे. अनेक भाविक तुळजापूर–पंढरपूर–गाणगापूर–अक्कलकोट असा धार्मिक प्रवास करताना या मार्गाचा वापर करत असल्याने या रस्त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

अर्धा रस्ता रुंद; उर्वरित काम प्रलंबित

सध्या तुळजापूर ते हंगरगा पाटी हा रस्ता तुलनेने रुंद आहे. मात्र हंगरगा पाटी–मंगरूळ–इटकळ हा भाग अद्याप अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. या भागाचे दोन पदरी रुंदीकरण झाल्यास प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होईल, असे वाहनचालकांचे मत आहे.

राजकीय पातळीवरही लक्ष देण्याची मागणी.राणा जगजितसिंह पाटील (आमदार, तुळजापूर) आणि सचिन कल्याण शेट्टी (आमदार, अक्कलकोट) हे दोघेही भाजपचे आमदार असून अक्कलकोट बाजूने सीमेपर्यंत रस्ता रुंद करण्यात आला आहे. मात्र तुळजापूर तालुक्यातील उर्वरित भाग अद्याप रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तुळजापूर ते इटकळ रस्ता तातडीने दोन पदरी करण्यासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

या मार्गाचे रुंदीकरण झाल्यास

तुळजापूर ते अक्कलकोट शॉर्टकट मार्ग तयार होईल ,वेळ, इंधन आणि प्रवासखर्चात मोठी बचत होईल ,वाहतुकीत वाढ होऊन ग्रामीण भागात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील,पर्यटन वाढल्याने स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

ग्रामस्थांची एकमुखी मागणी

इटकळ, टेलरनगर, दिंडेगाव, केशेगाव, निलेगाव,भातंब्री, राखेल, मंगरूळ, नांदुरी, काळेगाव, यमगरवाडी, कसई आदी गावांतील ग्रामस्थांनी तुळजापूर–इटकळ रस्ता तातडीने रुंद करण्याची मागणी केली आहे. हा रस्ता रुंदीकरण झाल्यास इटकळ ते अक्कलकोट हा आधीच चांगला आणि रुंद रस्ता असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments