उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील बंद शीतगृह सुविधा तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन छेडू

Hot Posts

6/recent/ticker-posts

उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील बंद शीतगृह सुविधा तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन छेडू

उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील बंद शीतगृह सुविधा तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन छेडू



ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन

उमरगा, दि. १५ : उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेली शीतगृह (फ्रीजर) सुविधा गेल्या दीड वर्षांपासून बंद असून त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून सदर सुविधा तात्काळ सुरू करावी, कायमस्वरूपी व्यवस्था उभारावी व यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने मा. आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, उमरगा यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतचे महत्त्वाचे शहर असून उमरगा, लोहारा व परिसरातील लाखो नागरिकांसाठी येथील उपजिल्हा रुग्णालय हे प्रमुख आरोग्य केंद्र आहे. अपघाती, संशयास्पद तसेच विविध कायदेशीर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रकरणांमध्ये शवविच्छेदनासाठी या रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत मृतदेह जतन करण्यासाठी आवश्यक असलेली शीतगृह सुविधा दीड वर्षांपासून बंद असणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे फाउंडेशनने नमूद केले आहे.

मृत्यू झाल्यानंतर अनेक वेळा नातेवाईक दूरवरून येत असतात किंवा विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मृतदेह जतन करून ठेवणे आवश्यक असते. मात्र शीतगृह सुविधा उपलब्ध नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना अमानुष त्रास सहन करावा लागत असून मृत व्यक्तीच्या सन्मानालाही बाधा पोहोचत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

फाउंडेशनने शासनाकडे शीतगृह सुविधा तात्काळ सुरू करणे, अत्याधुनिक कायमस्वरूपी शीतगृह उभारणे, सदर सुविधा दीड वर्षांपासून बंद राहण्यामागील कारणांची चौकशी करणे, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे तसेच उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाचे तांत्रिक व प्रशासकीय लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे.

यावेळी फाउंडेशनच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला असून, निवेदन प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास उपविभागीय कार्यालय व उपजिल्हा रुग्णालयासमोर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन, निदर्शने व पुढील टप्प्यात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

उमरगा व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक हक्कांशी तसेच मृत व्यक्तींच्या सन्मानाशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनने केली आहे.

या निवेदनावर ऍड. शीतल चव्हाण, सत्यनारायण जाधव, ऍड. ख्वाजा शेख, व्यंकट भालेराव, करिम शेख, धानय्या स्वामी, किशोर बसगुंडे, कविता साळी, किशोर औरादे, बबीता मदने, संतोष चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments