धाराशिव : श्रीपतराव भोसले विद्यालयात पीडब्ल्यूतर्फे विद्यार्थी–पालक–शिक्षक मेळावा संपन्न-Shripatrav Bhosale High School Dharashiv
धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये फिजिक्सवाला (PW) या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई व एनईईटी (नीट) परीक्षांची तयारी करून घेणारे वर्ग, तसेच इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन वर्ग चालवले जातात.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, त्यांच्या अध्ययनातील अडचणी समजून घेणे व त्यावर योग्य मार्गदर्शन करणे या उद्देशाने फिजिक्सवाला (PW) च्या माध्यमातून अध्ययन करणाऱ्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी–पालक–शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगती, येणाऱ्या अडचणी, अभ्यासपद्धती, झालेला अभ्यासक्रम, पुढील अभ्यासाचे नियोजन, तासिकांचे वेळापत्रक, विद्यार्थ्यांना दिला जाणारा डीपीपी (डेली प्रॅक्टिस पेपर), डाऊट सेशन, तसेच घेण्यात येणाऱ्या चाचण्या (टेस्ट) यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत मोकळेपणाने आपली मते व सूचना मांडल्या.
यावेळी उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे, पीडब्ल्यू फाउंडेशन वर्गांना मार्गदर्शन करणारे भौतिकशास्त्र विषयाचे श्री. प्रवीण मीना, रसायनशास्त्राचे श्री. दीप दास, गणित विषयाचे श्री. अंकित कुमार, तसेच फिजिक्सवाला विभाग प्रमुख श्री. ए. व्ही. भगत यांनी पालकांनी मांडलेल्या समस्यांचे समाधानकारक निराकरण केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त व सातत्य ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
या प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून श्री. पांडुरंग मुळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. पी. ए. गर्जे यांनी केले, तर कार्यक्रमाची रूपरेषा श्री. एन. के. मोमीन यांनी आखली. या पालक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शाखेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील, फ्लाईंग किड्स स्कूलच्या प्रशासकीय अधिकारी सौ. मंजुळाताई पाटील, मुख्याध्यापक श्री. एन. आर. नन्नवरे तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

0 Comments