श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे वडगाव (सिद्धेश्वर) येथे उद्घाटन
धाराशिव: श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत मौजे वडगाव (सिद्धेश्वर), ता. व जि. धाराशिव येथे विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हे शिबिर दिनांक १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.
शिबिराच्या उद्घाटन समारंभास गावचे सरपंच श्री. बळीराम कांबळे व प्रगतिशील शेतकरी श्री. अंकुश काका मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व, समाजसेवेची गरज तसेच स्वयंशिस्तीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे यांनी श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व विशद करत श्रमदानाच्या माध्यमातून समाजाशी नाते दृढ करण्याचे आवाहन शिबिरार्थ्यांना केले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोकाटे यांनी ग्रामस्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत स्वच्छ व सुदृढ गावनिर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन केले.
या शिबिराच्या कालावधीत ग्रामस्वच्छता, रस्ते स्वच्छता, हागणदारी मुक्त अभियान, गाजर गवत निर्मूलन, वृक्षारोपण, शोषखड्डे निर्मिती, गटार दुरुस्ती, नाले सफाई, मंदिर परिसर स्वच्छता, गावतळे स्वच्छता, एड्सविषयक जनजागृती, आरोग्य तपासणी शिबिर, बालविवाह प्रतिबंधक जनजागृती, महिला मेळावा, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन तसेच विविध सामाजिक विषयांवरील व्याख्याने असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोकाटे, सौ. करपे, सौ. पौळ, एम. एम. देशमुख मॅडम, राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरार्थी, सर्व शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शरद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. राज भोसले यांनी मानले. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, श्रमप्रतिष्ठा व ग्रामविकासाची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या शिबिरासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस श्रीमती प्रेमाताई पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. साहेबराव देशमुख, कला-वाणिज्य पर्यवेक्षक श्री. के. के. कोरके व विज्ञान पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.




0 Comments