राजकीय वादातून सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याचा खून-
सोलापूर : राजकीय वादातून सोलापुरातील रविवार पेठ, जोशी गल्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्षाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सोलापुरात मोठा राडा झाला असून रविवार पेठेतील भाजपाचे कार्यालय फोडण्यात आल्याचे सांगितले. या घटनेमुळे सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली असून महानगरपालिक निवडणुकीच्या तोंडावर हिंसक घटनेने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपच्या दोन उमेदवारांमध्ये अर्ज माघार घेण्याच्या कारणावरून वाद झाला होता हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यावर जीव घेणा हल्ला करून खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे, तर मनसेकडूनही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, बाळासाहेब पांडूरंग सरवदे असे खून झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. याबाबत मनसेचे शहराध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी माध्यमांना माहिती दिली. या घटनेनंतर रविवार पेठेत पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. घटनेनंतर बाळासाहेब सरवदे यास उपचारासाठी सोलापुरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याठिकाणीही जमावांनी गोंधळ घालत हॉस्पीटलमधील साहित्यांची तोडफोड केली. त्यानंतर रूग्णालयात पोलिस दाखल होताच परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की सोलापूर शहरातील मार्केट यार्ड नजीक रविवार पेठ जोशी गल्ली येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये येतो या ठिकाणी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांची वर्चस्व आहेत. तर त्यांचे चिरंजीव किरण देशमुख यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केली आहे.
याच प्रभागातील ओबीसी प्रवर्गातून भाजपच्या माजी नगरसेविका शालन शंकर शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याच प्रभागातून माजी सभापती हरिकांत सरवदे यांच्या सून रेखा सरवदे यांनीही भाजपकडून उमेदवारी मागितली होती. पक्षाने दोघींना शेवटपर्यंत झुलवत ठेवत शालन शंकर शिंदे यांना उमेदवारी घोषित केली; तर रेखा सरवदे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली होती. परंतु दुपारी अडीच वाजता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान गेल्या दोन दिवसापासून शिंदे आणि सरवदे या दोन गटात छोटी मोठी कुरबुर चालूच होती. शुक्रवारी सुद्धा दिवसभरात दोन वेळा भांडण झाली होती. सायंकाळी पावणे पाच वाजेच्या वेळेस रेखा सरवदे यांचे दीर बाळासाहेब सरवदे हे शंकर शिंदे यांच्या भाजप कार्यालय समोरून जात असताना शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर भांडणात झाले आणि बाळासाहेब सरवदे यांच्यावर दहा ते पंधरा लोकांनी घेराव करून तलवारी कोयता यांनी वार केले यात बाळासाहेब सरवदे गंभीर जखमी झाले. यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments