मोठी बातमी :जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजणार?,आयोगाची आज पत्रकार परिषद-
मुंबई: राज्यातील प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत अखेर हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज, मंगळवारी (१३ जानेवारी २०२६) दुपारी ४.०० वाजता एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह येथे ही परिषद पार पडणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर प्रशासक राज आहे. मतदार याद्यांचा कार्यक्रम आणि प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष मतदानाच्या तारखांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या या पत्रकार परिषदेत प्रत्यक्ष निवडणुकांचे वेळापत्रक, आचारसंहिता आणि टप्प्यांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारीच राज्य निवडणूक आयोगाला १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका घेण्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र, तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव निवडणूक आयोगाने १० फेब्रुवारीपर्यंत वेळ मागितला होता. अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरु केल्या आहेत.

0 Comments